पुणे : गाणं हीसुद्धा एक कला आहे. गाणं आवडणाऱ्याला आवडणं हे श्रोत्यांच्या मूडवर अवलंबून असते. जे गाणं ऐकल्यानंतर मनाला चांगलं वाटतं, ते गाणं चांगलं असतं. संगीतक्षेत्रात मी आजपर्यंत श्रोता म्हणूनच राहिलो असल्याची खंत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली. कवयित्री स्वाती पाटणकर यांनी गीत, संगीत, स्वर दिलेल्या ‘दरवळ सुखाची’ या ध्वनिचित्रफितीच्या सोमवारी झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी लेखिका सुलभा तेरणीकर, ध्वनिचित्रफितीचे संगीत संयोजक केदार भागवत, कमलेश चंगेडिया, रवींद्र्र पाटणकर, जयपूर घराण्याचे उभरते गायक शिलींद लहानगे व अन्य मान्यवर उपस्थित होते. विश्राम वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. शिलींद लहानगे यांनी राग ‘बिहाग’मधून ‘राजन के राजा राजन महाराजा’ ही बंदिश उलगडून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि टाळ्यांच्या कडकडाडाट प्रेक्षकांची दाद मिळवली.तेंडुलकर म्हणाले, ‘‘कलेच्या कोणत्याही क्षेत्राचा प्रवास करण्याचा निर्धार मनुष्याने केला तर तो एका जन्माचा नसून अनेक जन्मांचा आहे. कला ही जन्म-मृत्यूच्या घेऱ्यात कधीही अडकत नाही आणि जे गाणे ऐकल्यानंतर गुणगुणाव वाटते, ते त्या व्यक्तीच्या आवडीचे असते. म्हणूनच जी कलाकृती स्वत:ला विसरायला लावते, ती कलाकृती अतिशय उत्तम असते. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आतापर्यंत केवळ श्रोताच राहिलो
By admin | Updated: February 15, 2017 01:58 IST