काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या जागांतूनच काँग्रेसने राष्ट्रवादीकडे जागा मागितल्या आहेत. त्यांच्या नगरसेवकांना पक्षात प्रवेश देताना उमेदवारीचा शब्द दिल्यामुळे राष्ट्रवादीचा नाइलाज झाला आहे. एका प्रभागात चार जागा असल्यामुळे त्याच प्रभागातील अन्य जागा घ्याव्यात, असा उपाय राष्ट्रवादीने काँग्रेसला सुचवला होता, मात्र, त्याला काँग्रेसच्या नेत्यांनी नकार दिला आहे. त्या प्रभागातील सर्व जागा काँग्रेस मागत असल्यामुळेच चर्चा पुढे सरकायला तयार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.१०१ व ६१ असा जागा वाटपाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला दिला आहे; मात्र जागांचा आकडा बाजूला ठेवून कोणत्या जागा यावर चर्चा करू, असा आग्रह काँग्रेसने धरला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला संमती दिली; मात्र आता काँग्रेसने पक्षांतरित झालेल्या जागांचा आग्रह धरल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्याशिवाय काँग्रेसने ज्या जागा मागितल्या आहेत, तिथेही राष्ट्रवादीचे उमेदवार जोरात असल्याचे वातावरण असल्याचे राष्ट्रवादीचे मत आहे. त्यामुळे त्या जागा द्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. तर विजयाची खात्री नाही, अशाच जागा राष्ट्रवादीकडून दिल्या जात असल्याचे काँग्रेसचे मत आहे.दोन्ही पक्षांमधील चर्चा शहराध्यक्षांच्या स्तरावर होत आहे. त्यांच्यातील पक्षांतर्गत चर्चेत मात्र राष्ट्रवादीत जसे एकमत होत आहे ते काँग्रेसमध्ये होत नसल्यानेच चर्चा अडचणीत आली आहे, अशी माहिती मिळाली. काँग्रेसमध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम व शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे चर्चेचे अधिकार दिले आहेत. मात्र, त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पक्षाचे पुण्याचे प्रभारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही सल्ल्यापुरते सहभागी करून घ्यावे लागत आहे. त्याशिवाय पक्षाच्या पालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांचे मतही त्यांना लक्षात घ्यावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अजित पवार यांनी निर्णय घेतला असून, त्यात तडजोड करायला कोणीही तयार नाही.
आघाडीत तिढा
By admin | Updated: January 26, 2017 01:03 IST