पुणे : शहरातील मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत प्रत्येकी तीन पथकांनाच सहभागी होण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच इतर प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मिरवणुकीमध्येही तीनपेक्षा जास्त पथकांचा समावेश नसेल, अशी माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.येत्या रविवारी होणाऱ्या परिमंडळ-१ हद्दीतील लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य गणपती विसर्जन मिरवणुकांचे नियोजन बुधवारी पोलिसांकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार दर वर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक सकाळी १०.३० वाजता टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथून सुरू होईल. या मिरवणुकीमध्ये २०० गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या मिरवणुकीत ३ पथके सामील करण्याचा निर्णय १२ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी मानाच्या, तसेच प्रसिद्ध गणपतींच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांची नावेही जाहीर केली आहेत. मानाच्या गणपतीनंतर महत्त्वाचे शेवटचे पाच गणपती रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बेलबाग चौकात येतील. लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक-उंबऱ्या गणपती चौक व अलका टॉकीज चौक या प्रमुख तीन चौकांमध्ये गणेश मंडळांना जास्तीत जास्त १० मिनिटे थांबून वादन करता येईल. इतर चौकांमध्ये मंडळांनी थांबू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक दुपारी दुपारी १२ वाजता वसंतदादा पुतळा, पूरम चौक येथून सुरू होईल. या मार्गावर सुमारे २०० मंडळे सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक टिळक चौकामध्ये आल्यानंतर डावीकडे वळून गांजवे चौक व तेथून उजवीकडे वळून एस. एम. जोशी पुलाजवळील घाटावर विसर्जित होईल. मंडळांना टिळक चौकातून लकडी पुलाकडे जाता येणार नाही.
मानाच्या गणपतींना तीनच पथके
By admin | Updated: September 24, 2015 03:14 IST