पुणे : मटक्याचा धंदा, वेश्याव्यवसायातील तरुणींसोबतचा नियमित संपर्क, बेकायदा धंद्यांना अभय देणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे बेकायदा धंदे आणि धंदेवाल्यांशी लागेबांधे असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले आहे. शहरातील बेकायदा धंदे नेमके चालवते कोण, असा प्रश्न या कारवाईमधून निर्माण झाला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस फौजदार गुंगा पांडुरंग जगताप, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष भीमय्या भंडारी आणि विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुरेश छबनराव काकडे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुंगा जगताप यांनी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचे निलंबन आदेशामध्ये म्हटले आहे. जगताप यांची नेमणूक फरासखाना पोलीस ठाण्यात असून त्यांना गुन्हे शाखेशी संलग्न करण्यात आले होते, तर पोलीस नाईक संतोष भंडारी हा साथीदारांसह हडपसर येथील शेवाळवाडी जकात नाक्याजवळ मटका चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक तासगावकर यांनी पथकासह या अड्ड्यावर मंगळवारी संध्याकाळी छापा टाकला. भंडारीचे साथीदार सचिन रावसाहेब साळुंखे (रा. गवळीवाडी, शेवाळवाडी), देविदास पुंडलिक सलगर (रा. शेवाळवाडी) त्या ठिकाणी मटक्याच्या चिठ्ठ्या पैसे घेऊन देत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ३ हजार ३३० रुपयांचा ऐवज जप्त केला. हा अड्डा भंडारी चालवित असल्याचे निष्पन्न होताच त्याला अटक करण्यात आली. यासोबतच काही दिवसांपूर्वी विमानतळ भागात बेकायदा वेश्याव्यवसाय प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये काही तरुणींची सुटका करण्यात आली होती. यातील एका मुलीच्या मोबाईलवर पोलीस हवालदार सुरेश छबनराव काकडे याचे वारंवार फोन आल्याचे आढळून आले आहे. हा मोबाईल तपासासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र जरग यांच्याकडे होता. त्या वेळी काकडे याने पुन्हा केलेला फोन जरग यांनी उचलला होता. या गुन्ह्याचा तपास डेक्कन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले करीत आहेत. काकडे हा नियमितपणे पीडित मुलीच्या संपर्कात असल्याचे दिसून आले.
तीन पोलीसच करत होते मटक्याचा धंदा!
By admin | Updated: May 5, 2016 04:36 IST