पुणे : जे डब्लू मॅरियट हॉटेल (सेनापती बापट रस्ता) मधील बॅन्क्वेट हॉलमधून तीन लाखाची रोकड व लॅपटॉप असा ३ लाख २० हजाराचा किंमती ऐवज चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रणय गंगवाल (वय ३०, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी रात्री रात्री दहाच्या सुमारास घडली.
फिर्यादी गंगवाल हे येथील ठिकाणी लग्नाच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामासाठी आले होते. दरम्यान बॅन्क्वेट हॉलमधील एका टेबलावर त्यांनी लॅपटॉप व रोकड असलेली बॅग ठेवली होती. दरम्यान जवळ कोणी नसलेल्या संधीचा फायदा घेत चोरट्याने बॅग लंपास करीत पळ काढला. हॉलमध्ये शोध घेऊन देखील बॅग मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गंगवाल यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.