चिंचवड : वाढती गुन्हेगारी, वारंवार होणाऱ्या चोऱ्या व असुविधा या त्रासामुळे चिंचवड एमआयडीसीमधील छोटे-मोठे उद्योजक हैराण झाले आहेत. या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. असुरक्षित वातावरणामुळे येथील उद्योग अडचणीत आल्याच्या तक्रारी होत आहेत. महापालिका प्रशासनात विविध करांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बाजावणारे सुमारे दोन हजार उद्योजक चिंचवड एमआयडीसीत आपले उद्योगधंदे करीत आहेत. औद्योगिक नगरी अशी ओळख असणाऱ्या शहरात १९७०पासून चिंचवड परिसरात हा उद्योग सुरू आहे. डी १, २, ३, या तीन विभागांत याचा विस्तार झालेला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून एक लाखांपेक्षा जास्त कामगारांना काम मिळत आहे. यामध्ये सुमारे १८ ते २० हजार महिलांचाही समावेश आहे. मात्र, येथील असुविधा व वाढती गुन्हेगारी या मुख्य समस्या आहेत. यामुळे उद्योजकांचे स्थलांतर व आर्थिक मंदीचे सावट अशा परिस्थितीत येथील उद्योग सुरू आहेत. चिंचवड एमआयडीसीमध्ये अनेक छोटे-मोठे उद्योजक आहेत. मात्र, वाढत असलेली अनधिकृत भंगार मालाची दुकाने, बांधकाम व स्थानिकांची अरेरावी यांमुळे उद्योजक त्रस्त आहेत. कामगार संघटनांच्या नावाखाली अनधिकृत संघटना स्थापन करून उद्योजकांना त्रास देण्याचे प्रकार फोफावले आहेत.
भुरट्या चोरांनी घातलाय धुमाकूळ
By admin | Updated: February 9, 2017 03:22 IST