लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारकडून देण्यात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती न मिळाल्याने राज्यातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपये प्रमाणे निर्वाह भत्ता म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
सन २०१८-१९ मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ते पात्र असूनही ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. एकट्या पुणे विभागातच शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ६१४ आहे. पुणे विभागातील एकूण विद्यार्थी संख्या ३ हजार ४७ होती. राज्य सरकारकडून विभागनिहाय काही रक्कम दिली. त्याचे वाटप मोजक्याच विद्यार्थ्यांना झाले. त्यात ती तरतूद संपली, त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांना तिष्ठत बसावे लागले आहे. सरकार पूर्ण रक्कम देत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
राज्याच्या अन्य विभागातही हीच स्थिती आहे. प्राजक्ता मोडक या युवतीने सांगितले की ती गडचिरोली येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी पुण्यात होती. पदवीधर झाल्यानंतरही अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याशिवाय असे अनेक विद्यार्थी राज्यात आहेत.
कोट
स्वाधार योजनेसाठीच्या निधीची मागणी सरकारकडे केली आहे. निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना वितरित केला जाईल. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे.
(डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाजकल्याण