पुणे : माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आले, या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही हायटेक होत नागरिकांना घरबसल्या आॅनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत असून दीड महिन्यात महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित ६०० तक्रारी पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ७० टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. सोशल मीडियाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अनेक शासकीय कार्यालयांनी त्यांच्याशी संबंधित अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे स्वत:चे ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने १८ मे २०१५ रोजी पालिकेचे फेसबुक पेज, आॅनलाइन तक्रारींसाठी वेबपोर्टल व इंटाग्राम सुरू केले. महापालिकेच्या फेसबुक पेजवर महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार यांनी केलेली शहरातील विकासकामांची उद्घाटने, पाहणी, कर्मचाऱ्यांकरिता घेतलेले उपक्रम, महापालिकेच्या नवीन सुरू करण्यात आलेल्या योजना यांची माहिती दररोज अपडेट केली जात आहे. त्यालाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंटाग्रामवर पालिकेशी संबंधित उपक्रमांचे फोटो अपलोड केले जात आहेत. (प्रतिनिधी)
दीड महिन्यात ६०० तक्रारी
By admin | Updated: July 13, 2015 03:45 IST