पुणे : लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यात सुसंवाद साधून स्थानिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’च्या उपक्रमात धनकवडीतील शाळेचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नावर मार्ग निघाला. या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच स्थानिक नगरसेवक आणि जानुबाई ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांत संवाद घडून सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. धनकवडीतील नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटातच त्याला प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थाने सुसंवाद घडविण्याचा ‘लोकमत’चा प्रयत्न यशस्वी झाला. प्रभाग क्रमांक ६९ मधील नागरिकांचे सार्वजनिक प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम गिरिजाशंकर सोसायटीच्या सभागृहात शुक्रवारी झाला. त्या वेळी नगरसेवक शिवलाल भोसले, वर्षा तापकीर, सहायक आयुक्त सुकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) प्रकाश सातपुते, वाय. जी. कदम आदी उपस्थित होते. धनकवडीकरांची अस्मिता असलेल्या येथील महापालिकेच्या शाळेचा प्रश्न दीपक माने यांनी उपस्थित केला. त्या वेळी उपस्थितांत शाळेचे अनेक माजी विद्यार्थी असल्याने जुन्या आठवणींचा गहिवरही झाला. एकेकाळी तब्बल ३ हजारांवर विद्यार्थिसंख्या असलेली ही शाळा बंद पडली आहे. सध्या दुसरी शाळा पत्र्याच्या शेडमध्ये भरविली जात आहे. धनकवडीकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट नसल्याची खंत या वेळी सर्वच उपस्थितांनी व्यक्त केली. जानुबाई ट्रस्ट जागा देण्यास तयार असेल, तर महापालिकेचा योग्य पर्याय देण्यासाठी एकत्रित बैठक लवकरच घेण्याची तयारी उपस्थितांनी दर्शविली. (प्रतिनिधी)धनकवडीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगली शाळा देण्याची आमचीही इच्छा आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून ट्र्स्टच्या मालकीची असलेली जागा महापालिकेने ताब्यात घेण्यापेक्षा आम्ही इमारत बांधून देण्यासाठी तयार आहोत. त्याचा मोबदला म्हणून आम्हाला योग्य भाडे दिल्यास ट्रस्ट शाळा सुरू करण्यास तयार आहे.- श्रीरंग आहेर, कार्याध्यक्ष, जानुबाई ट्रस्टसद्यस्थितीत पत्र्याच्या शेडमध्ये भरणारी शाळा धनकवडीकरांसाठी अभिमानाची गोष्ट नाही. जानुबाई ट्रस्ट जागा देण्यास तयार असेल, तर महापालिकेचा योग्य मोबदला देऊन त्या ठिकाणी शाळा उभारण्यास तयार आहे. - शिवलाल भोसले, नगरसेवक‘लोकमत’च्या व्यासपीठावर पहिल्यांदाच शाळेचा विषय उपस्थित झाला. लोकप्रतिनिधी, अधिकारी व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न करणार आहे. - वर्षा तापकीर, नगरसेविका
धनकवडीतील शाळेचा प्रश्न लागणार मार्गी
By admin | Updated: January 10, 2015 00:38 IST