निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असल्याने काही पिके जळून गेली आहेत. तर, काही जळण्याच्या मार्गावर आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोसारख्या पिकाच्या लागवडीचा कंटाळा केला होता. मात्र, सद्य:स्थितीमध्ये टोमॅटोचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.शेतात होतं तवा बाजारात नव्हतं. आता बाजारात हाय तर शेतात न्हाय, अशा प्रतिक्रिया इंदापूर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. निमगाव केतकीसह संपूर्ण इंदापूर तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी आपल्या शेतात वर्षभर टोमॅटो पिकांचे उत्पन्न घेतात. कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून या तालुक्यातील लहान-मोठे शेतकरी या पिकाकडे पाहतात. त्यामुळे बाजारभाव मिळो अथवा न मिळो, तरीही आपल्या शेतात वर्षभर फडामागून फड घेऊन टोमॅटोपासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, या वर्षामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने परिसरातील व तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना उन्हाळा ऋतूमध्ये टोमॅटोचे पीक घेता आले नाही. यामुळे सध्या स्थितीमध्ये चांगला बाजारभाव मिळत असला, तरी शेतात टोमॅटो नसल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.आता या भागातील अनेक शेतकरी लागवड करण्याच्या तयारीत आहेत. पण, पाण्याची अवस्था बिकट झाली असल्याने येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)
शेतात होतं तवा बाजारात नव्हतं
By admin | Updated: July 18, 2014 03:48 IST