सचिन कांकरिया , नारायणगावजुन्नर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींमध्ये कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहणार, यावर पुढील राजकीय घडामोडींना दिशा मिळणार आहे़ वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात चढाओढ राहील़ अनेक तरुण कार्यकर्त्यांचा नवा चेहरा राजकारणामध्ये येणार असल्याने पुढील राजकीय रूपरेशा बदलणार आहे़ जुन्नर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीची मतमोजणी उद्या (दि़ ६) होणार आहे़ या मतमोजणीद्वारे अनेक राजकीय पक्षांचे भवितव्य ठरेल़ विधानसभेत मनसेने अचानक प्रतिनिधित्व मिळवून सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला होता़ शरद सोनवणे हे आमदार झाल्यानंतर तालुक्यातील राष्ट्रवादी व शिवसेनेला धक्का बसून मनसे आघाडी घेईल, असे वाटत होते़ परंतु आमदार सोनवणे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ व सध्या सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकांमध्ये स्वारस्य नसल्याने या निवडणुकीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला नाही़ त्यामुळे तालुक्यात आमदारपद मिळूनही मनसेला कोणत्याही संस्थेत आघाडी घेता आलेली नाही़ नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्वायत्तता देऊन निवडणूक लढविण्यास पुढाकार दिला. कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाला वर्चस्व मिळावे, यासाठी व्यूहरचना केली़ उद्या होणाऱ्या मतमोजणीमध्ये कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून अनेक तरुण कार्यकर्त्यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण होणार असल्याने पुढील काळात सर्व राजकीय घडामोडीत तरुणांचे वर्चस्व राहील, हे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये ५० टक्के महिलांची उमेदवारी असल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून गावपातळीवर ५० टक्के महिलांना कारभार करण्याची संधी मिळेल़ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक ही महत्त्वाची मानली जाते़
वर्चस्वासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ
By admin | Updated: August 6, 2015 03:42 IST