पुणे : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला चर्चेसाठी आम्ही तयार आहोत असे पत्र दोन दिवसांपूर्वीच पाठविले असले तरी, अद्याप मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना चर्चेसाठी कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, चर्चेसाठी कोणतीही बैठक ठरली नसल्याचा निर्वाळा एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी गुरुवारी दिला. गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी गेल्या ८४ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. केंद्रीय अर्थमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे शासनाबरोबर एकमत झाले असले तरी अद्याप कोणतेही लेखी आश्वासन विद्यार्थ्यांना मंत्रालयाकडून मिळालेले नाही. दि. १ सप्टेंबरला विद्यार्थ्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून चर्चेसाठी आम्ही तयार आहोत असे कळविले होते. यासंदर्भात मंत्रालय पुन्हा एकदा विद्यार्थ्यांशी तयार झाले असल्याचे संकेत स्टुडंट असोसिएशनला मिळाले असल्याचे विद्यार्थ्यांकडूनच स्पष्ट करण्यात आले. मात्र याविषयी स्पष्टीकरण देताना प्रशांत पाठराबे यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांबरोबर मंत्रालयाची अशी कोणतीही बैठक ठरलेली नाही, याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी आंदोलक विद्यार्थी हरिशंकर नच्चिमुथ्यू आणि इतर विद्यार्थ्यांनी मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी मंत्रालयाला पत्र पाठवावे अशी सूचना आपण केली. आंदोलक विद्यार्थी विकास अर्स यानेही पाठराबे यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, की आम्ही दोन दिवसांपूर्वी संचालकांच्या सांगण्यानुसार मंत्रालयाला पत्र पाठविले आहे, मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांशी चर्चेचे संकेत नाहीत
By admin | Updated: September 4, 2015 02:17 IST