बारामती : का-हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूलशिक्षण संस्थेच्या जमीन हस्तांतराबाबत तोडगा काढण्यासाठी बारामती येथे रविवारी (दि १८) आयोजित बैठक निष्फळ ठरली. याबाबतचा निर्णय फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत टोलविण्यात आला आहे. बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. या वेळी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूलशिक्षण संस्थेची जमीन विद्या प्रतिष्ठानला जोडण्यात आलेल्या ७३ एकर ७ गुंठे जमिनीच्या हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आज बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. दोन तासांहून अधिक काळ ही बैठक सुरू होती. बैठकीनंतर कार्यालयाबाहेर पडलेल्या पवार यांनी पत्रकारांशी अधिक भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीची माहिती सचिव देतील, तर सचिव अॅड. भगवान खारतोडे यांनीदेखील बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ‘सांगण्यासारखे विशेष काही नाही,’ असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.दरम्यान, उपाध्यक्ष अरविंद वाबळे यांनी सांगितले, की आजच्या बैठकीत आॅडिट रिपोर्ट, अंदाजपत्रक मंजूर करणे, २००७मध्ये झालेल्या जमीन हस्तांतरणाबाबत फेरविचार करणे आदी विषय होते. त्यापैकी विद्या प्रतिष्ठानला केलेल्या जमीन हस्तांतरणाबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. या सभेला सर्व अधिकार असतात, अशी सूचना पवार यांनी केली आहे. अधिवेशनापूर्वी फेब्रुवारी, मार्चमध्ये ही सभा होईल. या सभेतच जमीन हस्तांतरणाबाबत निर्णय होईल. जमीन विद्या प्रतिष्ठानकडे हस्तांतरित होऊ नये, अशी माझी व ग्रामस्थांची भूमिका असल्याचेदेखील वाबळे म्हणाले. जमीन परत देण्याची पवार यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी भराव्या लागणाऱ्या रकमेबाबत पवार यांनी विचारणा केल्याचे ते म्हणाले. महसुलाची रक्कम भरण्यासाठी निधी संकलन सुरू असल्याचे वाबळे यांनी सांगितले.
जमीन हस्तांतराबाबत तोडगा नाहीच
By admin | Updated: January 19, 2015 00:09 IST