पुणे : महापालिकेच्या इमारतींमधून बॅटरी, वाहनांचे पार्ट, नळाच्या तोट्या यांसह अनेक छोट्या-मोठ्या वस्तू चोरीला जात असल्याचे वेळोवेळी उजेडात आले आहे. मात्र या चोऱ्या रोखण्यासाठी पालिकेकडून कोणतीच खबरदारी घेतली जात नसल्याचे उजेडात आले आहे. पालिकेच्या मुख्य इमारत तसेच शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये, विविध कोठ्या, हॉस्पिटल, उद्याने येथील सुरक्षा व्यवस्थेचे आॅडिटच अद्याप करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या आवारात लावलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या, विविध पार्ट, डिझेल चोरी होण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. त्याचबरोबर महापौर निवासामधून एलईडी टीव्ही चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली आहे. या चोऱ्या रोखण्याकरिता सुरक्षा आॅडिट होणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षा आॅडिट झाल्यास पालिकेची सुरक्षा व्यवस्था कुठे कमकुवत आहे, याची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यानुसार सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करता येऊ शकणार आहेत. मात्र सुरक्षा आॅडिटबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या सुरक्षेचे आॅडिट नाहीच
By admin | Updated: November 2, 2015 01:12 IST