लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताने चिनी वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, चीन सरकारने भारताला चिनी वस्तूंशिवाय पर्याय नसल्याचे सांगत डिवचले आहे. प्रत्यक्षात चीन सरकारचे म्हणणे हे काहीअंशी खरे ठरले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रविवार पेठ, बोहरी आळीसारख्या मध्यवर्ती बाजारपेठेतही चिनी वस्तूंचा जुना माल विक्रीस काढला आहे आणि या वस्तूंच्या खरेदीस ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोदीसरकारने ‘स्वदेशी’चा नारा देत भारतीय वस्तूंच्या खरेदीवर भर द्या, असे आवाहन केले असले तरी भारतीय वस्तूंच्या तुलनेत चिनी वस्तू स्वस्त आहेत. त्यामुळे चिनी मालालाच पसंती दिली जात आहे. दरम्यान, मोबाईलमध्येही चीनचेच वर्चस्व अधिक असून, ‘वन प्लस’ला तरुणाईची अधिक मागणी आहे. या मोबाईलच्या ऑनलाईन खरेदीला तरुणवर्गाकडून प्राधान्य दिले जात आहे.
लडाखच्या सीमेवर चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर, भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा देत आवाहन केलेल्या स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला लोकांनी प्रतिसादही देण्यास सुरुवात केली. मात्र, कोरोनाने लोकांना देशप्रेमापेक्षा जगण्याचा धडा दिला. दिवसेंदिवस वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागत असल्याने स्वस्त वस्तूंच्या खरेदीकडे आता लोकांनी मोर्चा वळविला आहे. चीनवरून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये लाईटच्या माळा, सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. चिनी वस्तूंच्या आयत-निर्यातीवर बंदी असल्याने नवीन माल बाजारपेठेत आलेला नाही. परंतु, जो माल दोन वर्षांपासून घेऊन ठेवला आहे, त्याचे करायचे काय? म्हणून जुना चायना माल विकला जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे.
--------------------------------------