लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “माननीय मुख्यमंत्री म्हणतात बॉलिवूड मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. ते बॉलिवूडची चिंता करतात. त्यांचे सुपुत्र पब आणि बारची चिंता करतात. ठाकरे पिता पुत्राला केवळ या दोनच गोष्टींची अधिक चिंता आहे,”अशी टीका माजी मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी केली. पब, बार आणि रेस्टॉरंट नियम घालून उघडली जाऊ शकतात तर योग्य नियम घालून मंदिरे का उघडली नव्हती? कोणीही मागणी करत नसताना पब, रेस्टॉरंटची वेळ का वाढवली, असे प्रश्नही शेलार यांनी केले.
पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपा आघाडीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. २१) ते बोलत होते. पुणे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, निवडणूक प्रमुख राजेश पांडे आदी यावेळी उपस्थित होते.
शेलार म्हणाले, “महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेचा जाहीर निषेध करतो. महाआघाडीचा एक नेता म्हणाला की मतदारांशी संभाळून बोला ते रेकॉर्ड करतील. मतदारांवर असा अविश्वास दाखवणाऱ्यांचा निषेध करतो. ठाकरे सरकारने वर्षभरात जी दयनीय अवस्था केली त्या विरोधात मतदारांनी कौल द्यावा.” इतके पळकुटे आणि पराधीन सरकार यापूर्वी बघितले नाही. जनतेच्या प्रश्नावर पळ काढतात किंवा पराधीन आहोत असं उत्तर देतात.
राज्य सरकारने शाळा सुरु करण्याची तारीख दिली. मात्र ती देताना संबंधित यंत्रणांशी कुठेही चर्चा केली नाही. शाळा सुरू करण्याबाबत सरकारने संभ्रम निर्माण केला. हे सरकार आहे? की छळवणुकीचे केंद्र आहे, असा प्रश्न त्यांनी केला. “राज्य सरकारने जी नावे राज्यपालांना दिली. त्या साठी २१ नोव्हेंबर पर्यंतची मुदत होती. मात्र राज्यपालांना ‘अल्टीमेटम’ देण्याची कुठली पद्धत आहे? राज्यपालांना दिलेला ‘अल्टीमेटम’ हा शब्दच मान्य नाही. राज्यपाल त्याला जुमानतील असे मला वाटतं नाही,” असे शेलार यांनी सांगितले.