निमोणे : अगोदरच कमी भावाचा सामना करीत असलेल्या कांदा उत्पादकांना बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. करपा, मावा या रोगांतून कसेबसे जगवतो तोच आता फूट होणे व ढेंगळे फुटणे हे प्रकार वाढत आहेत. यामुळे कांद्याची प्रतवारी खालावल्याने उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. शिरूरच्या पूर्व भागात याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिसरातील करडे, आंबळे, चव्हाणवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वी येथे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पीक घेतले जाते. विशेषत: बारमाही मुबलक पाण्याची उपलब्धता असणारे छोटे शेतकरी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. कांद्याची लागवड करून पीक बाजारामध्ये जाईपर्यंत शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच हे पीक हवामान बदलास अत्यंत संवेदनशील असल्याने त्वरित रोगास बळी पडते. चालू हंगामामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस आणि ढगाळ हवामान होते. या ढगाळ हवामानामुळे मावा, करपा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. या रोगांचा सामना करता-करता आणि औषध फवारण्या करून शेतकरी मेटाकुटीस आला. कांदा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना तयार कांद्याची फूट होणे व ढेंगळे तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या या दोन्ही समस्यांनी कांदापीक ग्रस्त झाले असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता आहे. हवामानबदलाचा कायमस्वरूपी सामना करत सातत्याने तोट्यात जाणारी कांदा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)
कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत अश्रूच
By admin | Updated: January 16, 2015 23:58 IST