भोर : नगरपालिकेने सन २०१४-१५ या वर्षात शहरातील मिळकतधारकांच्या करात चौपट (४० टक्के) वाढ केल्याने नागरीक संपतप् झाले आहेत. ही वाढ अन्यायकराक असून फेरसर्व्हे करावा, अशी मागणी केली आहे. तोपर्यंत जुन्याच दराने करवसुली करावी; अन्यथा कर न भरण्याचा इशाराही दिला आहे. शहरातील मिळकतीचा सर्व्हे करण्यासाठी भोर नगरपलिकेच्या वतीने टेंडर काढण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुमारे २५ लाख रुपयांची तरतूद केली होती. ते टेंडर झेनोलीक जिओ सर्व्हिसेस, पुणे या संस्थेला मिळाले होते. या कंपनीच्या वतीने भोर शहरातील सुमारे ४८०२ मिळकतधारकांचा चार प्रभाग करून त्यानुसार सर्व्हे केला होता. भोर नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत १० टक्के करवाढीचा ठराव पाठवला असतानाही नगररचना विभागाने चौपट (४० टक्के) करवाढ केली. ही अन्यायकारक आहे. नगरपालिका ही डोंगरी भागातील ‘क’ वर्ग नगरपालिका आहे. औद्योगिक वसाहती नाहीत. उत्पन्नाचे साधन नाही. शिवाय शहरातील घरे संस्थानकालीन ५० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहेत. मिळकतींचा झालेला सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाल्याने अनेकांची करवाढ भरमसाट झाली आहे. उत्पन्नाच्या मानाने ही करवाढ परवडणारी नाही. त्यामुळे त्यात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या करवाढीवर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यावर ६५० नागरिकांनी हरकती दिल्या होत्या. या सर्वांना नगररचना विभागाने एकाच दिवशी लोकांना बोलावून बोळवण केली. कोणाचे म्हणणे न ऐकताच त्याच्या हरकती फेटाळून लावल्या. शिवाय ज्यांच्या हरकती आहेत त्यांनी नवीन कराची ३० टक्के रक्कम भरून नंतरच अपील करायचे आहे. हे नागरिकांना मान्य नसून यामुळे भोर शहरातील नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार संग्राम थोपटे यांना दिले आहे. (वार्ताहर)
भोर शहरावर करांचा चौपट बोजा!
By admin | Updated: February 22, 2015 22:46 IST