मंचर : राज्य सरकार बैलगाडामालकांची बाजू पुनर्विचार याचिकेद्वारे न्यायालयात मांडील. तसेच, न्यायालयीन प्रक्रिया लक्षात घेऊन बैलगाडामालकांवरील खटले मागे घेतले जातील, अशी माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी गुरुवारी दिली. बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असून, या शर्यती पूर्णपणे बंद झाल्या आहेत. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात व त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी बैलगाडामालकांच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. मुंबई विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे -पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आर.आर. पाटील बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. बैलगाडा विमा योजनेचे अध्यक्ष दत्ता थोरात, सरपंच विनोद मोढवे, उपसरपंच शिवाजी निघोट, संभाजी निघोट, रामकृष्ण टाकळकर, बाळासाहेब आरूडे, नवनाथ होले, बैलगाडामालक बाबाजी भक्ते, पांडुरंग टाव्हरे, मारुती वाबळे, संदीप बोडगे, तसेच कवठे महांकाळ येथील शिष्टमंडळाने बैलगाडामालकांची बाजू मांडली. बैलगाडा शर्यतीची परंपरा सुरू राहिली पाहिजे. शेतकर्यांच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी विनंती बैलगाडामालकांनी या वेळी केली.(वार्ताहर)
बैलगाडामालकांवरील खटले मागे घेणार
By admin | Updated: May 30, 2014 04:45 IST