बारामती : माळेगाव (ता. बारामती) येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी वारंवार महिलांच्या वतीने आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, तात्पुरत्या कारवाईव्यतिरिक्त पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याने पुन्हा या अवैध धंद्यांनी तोंड वर काढले आहे. त्यामुळे बारामती येथील महिला कार्यकर्त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांची भेट घेऊन या अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास या महिलांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागील वर्षी माळेगाव येथे अवैध धंद्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला अवैध दारूविक्री करणारी महिला, तिचा पती व मुलाने जबर मारहाण केली होती. या मारहाणीनंतर विविध संस्था व संघटनांनी जोरदार निषेध केला होता. या प्रकरणाची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर येथील अवैध धंद्यांवर कारवाईही झाली. परंतु ती तात्पुरतीच ठरली. आता पुन्हा या अवैध धंद्यांनी डोकेवर काढले आहे. माळेगाव परिसरामध्ये अवैध दारू विक्री, मटका आदी प्रकार सर्रासपणे दिवसाढवळ्या सुरू असतात. या वेळी रासपच्या पुष्पा देवकाते, शांता कोळेकर, शिवसेनेच्या सुनीता खोमणे, संगीता पोमणे, आरपीआयच्या रत्ना साबळे यांनी चिखले यांना निवेदन दिले आहे. (वार्ताहर)
माळेगाव येथील अवैध धंद्यांवर कारवाई करा
By admin | Updated: June 30, 2015 23:09 IST