- सायली जोशी, पुणेशाळा भरताक्षणी वर्गातले शिक्षक पुस्तकांऐवजी आपापले टॅब बाहेर काढताहेत आणि डस्टरने फळा पुसण्याऐवजी डिजिटल स्क्रीनद्वारे शिकवताहेत... अगदी शाळांतही अशी डिजिटल क्रांती येत आहे. विशेष म्हणजे त्याची सुरुवातही होत आहे, विद्येच्या माहेरघरातूनच! शिक्षणाची परंपरा जपलेल्या पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलने (टिळक रोड) संपूर्ण शाळाच डिजिटल केली आहे. राज्यातील या स्वरुपाचा हा पहिलाच अभिनव प्रयोग ठरणार असून लवकरच त्याची औपचारिक घोषणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. त्याला प्रतिसाद देणारा हा उपक्रम लक्षवेधी ठरणार आहे. पारंपरिक पद्धतींना फाटा देत शाळेने 'हायटेक' साधने हाती घेतली आहेत. शाळेत प्रत्येक शिक्षकाला टॅब देण्यात आला आहे. त्यावर त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम 'अपलोड' केलेला आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, गुणपत्रिका हे सारे आॅनलाईन मिळू शकणार आहे. त्यामुळे पुढील शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी या कागदपत्रांची गरज लागल्यास विद्यार्थी थेट शाळेच्या संकेतस्थळांवरुनही त्या घेऊ शकतात. तसेच शिक्षकांचे कामही यामुळे सोपे झाले असून वर्गात घेतली जाणारी दैनंदिन हजेरी, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, त्यांची शैक्षणिक प्रगती यांचे रेकॉर्डही आॅनलाइन असणार आहे. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शाळेतील रजिस्टर भरणे व इतर प्रशासकीय कामे सोपी होणार आहेत. गृहपाठ मेलवर पाठवणे शक्य पुढील काळात असाच तंत्रज्ञानाचा वापर वाढला तर मुलांना गृहपाठही मेलवर पाठविणे शक्य होणार आहे. ‘एसएमएस’द्वारे कळेल प्रगती...पालक सभा, पाल्याची प्रगती याची माहिती पालकाला शाळेकडून ‘एसएमएस’वर कळवली जाणार आहे. त्यामुळे पाल्याची शाळेत काय प्रगती आहे हे घरबसल्या कळेल. यामध्ये पाल्याच्या शैक्षणिक कामगिरीसह ‘एनसीसी’त सहभागी असेल, शालेय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला असेल तर तीही मिळणार आहे. सध्या विज्ञान, गणित, भूगोल यांसारखे विषय शिक्षक डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे शिकवत आहेत; परंतु तंत्रज्ञानाचा वापर करुन भाषा शिकवणे हे अजूनही आव्हान असून येत्या काळात त्यावरही विचार करण्यात येईल. तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण सोपे व परिणामकारक होईल, अशी आशा आहे.- नागेश मोने, मुख्याध्यापक
शिक्षकांच्या हाती खडूसोबत टॅब
By admin | Updated: July 12, 2015 00:16 IST