पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव वाढत आहे. मंगळवारी स्वाइन फ्लूचे २१ रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात अधिक रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. महापालिकेच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. मात्र, स्वाइन फ्लू थांबण्याऐवजी वाढत आहे. पालिकेच्या वतीने कागदोपत्री उपाययोजना दाखवल्या जात आहेत. त्या प्रत्यक्षात कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रसार कमी होण्याएवजी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरामध्ये मंगळवारी एक हजार ८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २८३ रुग्णांना टॅमिफ्लूचे औषध सुरूकरण्यात आले, तर ४० रु ग्णांच्या लाळीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यात २१ रुग्ण स्वाइन फ्लू झालेले आढळून आले आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यासाठी महापालिकेने उपाययोजना म्हणून कंपन्यांकडून औषधखरेदी केली आहे. दोन लाख पोस्टर वाटले आहेत. शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या उपाययोजना असल्या, तरी महापालिका प्रशासन वातावरणाला आणि राज्य सरकारला दोष देत बसले आहे. या उपाययोजनांमध्ये वाढ करून स्वाइन फ्लूचा प्रसार कमी करण्यासाठी कागदोपत्री नाहीतर प्रत्यक्षात योजना आखणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे; परंतु पालिकेनेही त्यांना योग्य मार्गदर्शन करून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. इतर कोणत्याही कामासाठी हजारो कोटी रुपये उधळणारी महापालिका आरोग्याच्या बाबतीत उदासीन दिसून येत आहे. आरोग्य विभागच नाही, तर प्रत्यक्ष आयुक्तांनीही या प्रकरणात लक्ष घालून त्यावर प्रभावी उपाययोजना करुन ही साथ आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचे २१ रुग्ण
By admin | Updated: February 25, 2015 00:39 IST