पुणे : दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या स्वारगेट बसस्थानकाला चकाचक ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थानकात अस्वच्छता निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जाणार आहे. त्यामुळे बसस्थानक सतत स्वच्छ राहील, अशीे अपेक्षा एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्याच्या विविध भागातून स्वारगेट बसस्थानकात प्रवाशांची ये-जा सुरू असते. दररोज हजारो प्रवाशांमुळे स्थानकात सातत्याने स्वच्छता ठेवणे अपरिहार्य आहे. मात्र, कर्मचाऱ्यांकडून कामात होणाऱ्या कुचराईमुळे अस्वच्छता दिसत होती. हे टाळण्यासाठी सतत गजबजलेल्या या बसस्थानकाला स्वच्छ ठेवण्यासाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाने अभिनव पाऊल उचचले आहे. स्वारगेट बसस्थानकाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदारामार्फत १४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व कमर्चारी तीन पाळ्यांमध्ये स्वच्छतेचे काम करणार आहे. हे कर्मचारी स्वारगेट बसस्थानकातील खुर्च्या, परिसर, कार्यालय अशा सर्वच ठिकाणची स्वच्छता करणार आहेत. या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवली जाणार आहे. स्थानकामध्ये कशा प्रकारे स्वच्छता ठेवण्यात आली आहे, याची दर दोन तासांनी एसटीचे अधिकारी पाहणी करणार आहेत. स्थानकातील शौचालय स्वच्छतेसाठीही स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती एसटीचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली.
स्वारगेट बसस्थानक राहणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 05:39 IST