लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अग्नितांडव होऊन कंपनीतच कोळसा झालेल्या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार धरून एसव्हीएस कंपनीचा मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) याच्यावर पौड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शहा याला अटक केली आहे.
या प्रकरणात स्थापन केलेल्या उपविभागीय दंडाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षेतखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या सदस्यांनी घटनास्थळाला भेट देऊन त्यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात परवानगीपेक्षा अधिक ज्वालाग्राही पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणावर केला होता. त्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. ज्वालाग्राही कच्चा माल साठवणुकीचे ठिकाण व काम करण्याच्या जागा एकच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रसायनांनी पेट घेऊन स्फोट झाला व आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. समितीच्या अहवालानंतर ग्रामीण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निकुंज शहा याला अटक केली आहे. समितीच्या अहवालात १२ मुद्यांचा समावेश आहे.