वडगाव निंबाळकर : जमीन खरेदीसाठी दिलेले पैसे परत करूनसुद्धा खासगी सावकारांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील चांगदेव विठ्ठल क्षीरसागर (वय ६०) यांनी आत्महत्या केली. गावातील बाजारतळालगत ओढ्याशेजारी असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना मंगळवारी (दि.५) पहाटे घडली. या प्रकरणी दहा जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रतीक चांगदेव क्षीरसागर (वय २१, रा. वडगाव निंबाळकर) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मयत चांगदेव क्षीरसागर यांनी जमीन खरेदीसाठी आरोपी दादा भोसले, बाबा सोनवणे, अस्लम पठाण (सर्व रा. बारामती), नितीन देवकाते, पांडा धायगुडे (रा. मेखळी), विष्णू शिंदे (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) पांडुरंग जाधव (रा. सांगवी, ता. बारामती) मंथन बबनराव कामथे (रा. रुई, ता. बारामती) नीलेश मदने (रा. वडगाव निंबाळकर) यांच्याकडून पैसे घेतले होते. हे पैसे परत करूनही सर्व आरोपींनी चांगदेव यांना वारंवार फोनवर धमकी देऊन, प्रत्यक्ष घरी जाऊन पैशासाठी तगादा लावला होता. त्यांच्या या जाचाला कंटाळून या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे करीत आहेत.
सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
By admin | Updated: April 7, 2016 00:49 IST