नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरानजीक पिंपरे खुर्द येथे पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे तरुण ठार झाले आहेत. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला. मनोहर धर्मराज तांबे (वय २८, रा. तांबराजुराई, जि. बीड) आणि आशिष अनिल बारगजे (वय २६, रा. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दरम्यान, नीरा पोलिसांनी अपघातातील ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेऊन जप्त केली असून ट्रॅक्टरचालक भीमराव बबन ठोंबरे याला अटक केली आहे. नीरा शहरानजीक पिंपरे खुर्द गावच्या हद्दीतील पालखी मार्गावर जेजुरी बाजूने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर दोन ट्रॉलीने उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर नीरेकडे येणारी ट्रॅक्टर-ट्रॉली आणि नीरा बाजूने जेजुरीकडे जाणारी मोटारसायकल या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात उसाने भरलेल्या ट्रॉलीचे पुढील चाक अंगावरून गेल्याने मोटारसायकलवरील मनोहर तांबे हा जागीच ठार झाला. त्याचा साथीदार आशिष अनिल बारगजे गंभीर जखमी होऊन बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडला होता.या अपघाताची खबर मिळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव, पोलीस हवालदार सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड अपघातस्थळी तत्काळ दाखल झाले. बेशुद्धावस्थेतील बारगजे याला जेजुरी येथे उपचारासाठी पाठविले. जेजुरीतून पुढील उपचारासाठी सासवडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी आशिष बारगजे याची प्राणज्योत मालवली. (वार्ताहर)
ऊस ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत दोघे ठार
By admin | Updated: February 7, 2016 03:34 IST