लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जगभरातील साखर उद्योग वेगळ्या वळणावर येऊन थांबला आहे. नव्या संशोधनाची या उद्योगाला गरज आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन (डीटीएसए) हे संशोधन देऊ शकते, असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.
साखर कारखाने, संशोधक, शास्त्रज्ञ तसेच नवे संशोधन याची माहिती असलेल्या ‘डीटीएसए’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन संस्थेच्या सभागृहात शनिवारी (दि. ३०) गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. साखर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या संशोधकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
गायकवाड म्हणाले की, नवे तंत्रज्ञान, नवे संशोधनाची उद्योगाला गरज आहे. त्यात उसाच्या नव्या बेण्यापासून ते कारखान्यात बदल करून उत्पादनातही वेगळेपणा कसा आणता येईल याचा समावेश आहे. इथेनॉल निर्मिती हे उद्योगाचे सध्याचे वळण आहे. बीटपासून साखर निर्मितीचा अभ्यास व्हायला हवा. डीटीएसए सारखी संस्था हे करू शकते.
डॉ. सुरेश पवार, डॉ. मोहन डोंगरे, बाळू आहेर, डॉ. संजीव माने या संशोधकांचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद गंगावतीन यांनी स्वागत केले. कार्यकारी सचिव आरती देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष एस. बी. भड यांनी आभार मानले.