शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात वाढत्या उन्हाच्या काहिलीने पालेभाज्यावर्गीय पिकांसह हंगामातील पिके कोमेजू लागली आहेत. पिके वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सकाळपासूनच सूर्यदेवता उन्हाच्या रूपाने चांगलीच आग ओकत आहे. त्यामुळे पिकांना धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी उन्हाळी हंगामात शेतात पालेभाज्यावर्गीय पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकरी आकर्षित होऊ लागला आहे. साधारण महिना ते दीड महिन्यात पूर्णत्वास येणाऱ्या पालेभाज्यांची टाकणी शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली आहे. खेडच्या पूर्व भागातील शेलगाव, दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव, वडगाव-घेनंद, मरकळ, गोलेगाव, बहुळ, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, नवीनगाव, मोहितेवाडी, चिंचोशी आदी गावांसह शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग पालेभाज्या पिकांचे उत्पादन घेण्यात मोठ्या प्रमाणात अग्रेसर मानला जातो. सध्या शेतातील टाकणीयुक्त पालेभाज्यांची पिके वाढत्या उन्हाच्या चटक्याला बळी पडत असून, वाया जाऊ लागल्या आहेत. बाजारात पालेभाज्यांना चांगली मागणी असल्याने बाजारभावही कडाडले आहेत. तोडीव पिकांनाही चांगला दर प्राप्त होत आहे. परंतु, अनुकूल वातावरणात पालेभाज्या टिकविण्याचे आव्हान उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.(वार्ताहर)
उन्हाचा पारा पिकांच्या जिव्हारी
By admin | Updated: April 6, 2016 01:23 IST