पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासह शिक्षण विभागाच्या इतरही काही कार्यालयांमध्ये फायलींचा डोंगर साचला असून, काही शिक्षण अधिकाऱ्यांकडून संस्थाचालकांपुढे पायघड्या घातल्या जात आहेत. मात्र, झालेल्या अन्यायावर दाद मागण्यासाठी येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणतीही कामाची फाईल पुढे सरविण्यासाठी टेबलाखालून व्यवहार करावा लागत आहे, अशा तक्रारी थेट शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत आल्या आहेत. त्यामुळे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पुण्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयांना अचानकपणे भेटी देण्याचे ठरविले आहेत.शिक्षण उपसंचालक कार्यालयात फायलींचा ढीग साचला असून, अनेक फाईल्स गहाळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचप्रमाणे माहिती अधिकारात मागितलेल्या प्रश्नांची उत्तरे वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. शिक्षण आयुक्त कार्यालयात याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आयुक्त भापकर यांनी पुढील आठवड्यापासून पुण्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयांना अचानक भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे. भापकर म्हणाले, की पदभार स्वीकारल्यानंतर ज्या भागात जाणे शक्य झाले, अशा नाशिक, धुळे व पुणे जिल्ह्यांतील कार्यालयांना उद्यापासून भेटी देणार आहे आणि कामकाजाची तपासणी करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
शिक्षण आयुक्तांच्या अचानक भेटी
By admin | Updated: October 28, 2015 23:58 IST