हडपसर : जन्मापासून हृदयात छिद्र... वैद्यकीय खर्च चार लाख रुपये... लोकवर्गणी काढूनही शस्त्रक्रियेचा खर्च जमा होईना म्हणून हतबल तरुणास आस्था फाउंडेशन व शहीद भगतसिंग ट्रस्ट या सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला अन् मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.चंद्रशेखर दत्तात्रय वाघमारे (वय २५, रा. स. नं. ३७, गल्ली नं. १४, केतकेश्वर कॉलनी, काळेपडळ) असे युवकाचे नाव आहे. हा युवक हडपसर येथे एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचे वडील श्रावणधारा सोसायटीमध्ये माळीकाम करतात, आई गृहिणी आहे. छोटा भाऊ कॉलेज शिकत आहे. चंद्रशेखरच्या जन्मापासूनच हृदयाला छिद्र होते. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने या युवकाला शस्त्रक्रिया करता आली नाही. लहानपणी मिल्ट्री रुग्णालयात ४० लाख रुपये खर्च सांगितला होता. आजतागायत अनेक वेळा लोकवर्गणी काढून शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्याला यश मिळाले नाही. अडचणीत असताना या युवकास कोणीच मदत करीत नव्हते, अशा गंभीर परिस्थितीमध्ये आस्था फाउंडेशनचे सदस्य गिरीश जगताप यांनी या युवकास योगेश जगताप व विजय मोरे यांच्याकडे पाठविले. चंद्रशेखरची कागदपत्रे व वैद्यकीय रिपोर्ट पाहून त्याला शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचे आश्वासन दिले. राजीव गांधी योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करून दिली. सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यावर या युवकाने योगेश जगताप आणि विजय मोरे यांचे आभार मानले. (वार्ताहर)
हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Updated: November 14, 2016 03:04 IST