बारामती : बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेने पूर्व प्राथमिक प्रवेशप्रक्रियेमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाबाबतची खोटी कागदपत्रे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला सादर केली आहेत. त्यामुळे या शाळेची खोट्या कागदपत्रांबाबत सोमवारपासून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, चौकशीमध्ये शाळा व्यवस्थापन दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी के. एस. दोडके यांनी दिली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे : २०१२-१३च्या शासनाच्या निर्णयानुसार दुर्बल आणि वंचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शाळा प्रवेशामध्ये २५ टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, असा अध्यादेश असताना मएसोच्या निर्मला हरिभाऊ देशपांडे आपल्या शाळेतील १०० टक्के प्रवेशशुल्क आकारून प्रवेश दिल्याचे आढळून आले आहे. शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, असा नियम लागू केला आहे. मात्र, देशपांडे शाळेने हा कोटा पूर्ण न करता पहिली ते चौथीच्या ६०० विद्यार्थ्यांचे नियम डावलून प्रवेशशुल्क घेतले आहे. तसेच, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला १०० टक्के प्रवेश मोफत दिल्याची खोटी कागदपत्रे सादर केल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत सोमवारपासून निर्मला हरिभाऊ देशपांडे शाळेची शिक्षण विभागाकडून चौकशी होणार आहे. यामध्ये शाळा व्यवस्थापन दोषी अढळल्यास शाळेला विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क परत करावे लागेल. तसेच, शाळेची मान्यता काढून घेण्यापर्यंत कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.बारामती तालुक्यातील २२ शाळांची २५ टक्के मोफत प्रवेशाबाबतच्या कोट्याची चौकशी सुरू आहे. काही शाळांनी अद्याप २५ टक्के मोफत प्रवेशाचा कोटा पूर्ण केलेला नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. हा कोटा पूर्ण करण्यासंबंधी शिक्षण विभागाने सूचना दिलेल्या आहेत. तसेच, पुढील काही दिवसांत हा कोटा पूर्ण केला की नाही, याची शहानिशा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे, असे दोडके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खोटी कागदपत्रे सादर ; देशपांडे प्रशालेची चौकशी
By admin | Updated: July 5, 2014 06:33 IST