लोणी काळभोर : पूर्व हवेलीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवैैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई सुरू आहे. यात सोमवारी (२९ जून) ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत ३ लाख ८९ हजारांचा, तर आज केलेल्या कारवाईत १ लाख ९५ हजारांचा, अशी ५ लाख ८४ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. उपविभागीय अधिकारी पुणे व हवेली तहसीलदार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. आज सकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊरफाटा व चौधरी वस्ती सोरतापवाडी येथे महसूल पथकाने केलेल्या कारवाईत थेऊर मंडलाधिकारी हरिदास चाटे, तलाठी संतोष चोपदार, विष्णू चिकणे, मिलिंद सेठी, अशोक शिंदे व रामदास तारू, हेमंत वाळुंज, रामदास काकडे, राजू राजपुरे, पप्पू शिवले, सतीश जाधव, प्रफुल्ल भिलारे, रहिम शेख, जीवन म्हस्के आदी सहभागी झाले होते. या पथकाने मातीने भरलेला एक ट्रक व क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या सात वाळूच्या गाड्यांवर कारवाई करून १ लाख २० हजारांचा दंड वसूल केला.तर, केसनंद येथे उरुळी कांचनचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे व वाघोलीचे तलाठी एस. बी. भोर, तुळापूरचे तलाठी मधुकर भांबळे व लोणीकंदचे तलाठी गुलाब दिघे व पिंपरी सांडसचे तलाठी गेणभाऊ शेवाळे यांनी सहा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत ७५ हजारांचा दंड वसूल केला आहे. २९ जून रोजी पुणे-नगर महामार्गावर चंदननगर येथे कळसचे मंडलाधिकारी सोमनाथ भोरडे, लोहगावचे तलाठी हिंदुराव पोळ, खराडीचे तलाठी दिलीप पलांडे, वडगावशेरीचे तलाठी कविता पाठक, धानोरीचे तलाठी एस. पी. शिंदे यांनी २३ ट्रकवर कारवाई करत १ लाख ४७ हजारांचा दंड वसूल केला. खडकवासलाचे मंडलाधिकारी सोपान जगताप व खेड शिवापूरचे शेखर शिंदे यांनी तलाठी राजू कांबळे, शिवाजी देशमुख महाडीक, तलाठी रतन कांबळे, पुष्पा गोसावी व कोतवाल नामदेव शिंदे, रवि घुले, संतोष कुटे, रतन हिंगणे या पथकाने दहा अनधिकृत वाळू वाहनांवर कारवाई करत १ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. कोरेगावमूळ (ता. हवेली) येथे गायरान जमिनीमध्ये बेकायदेशीररीत्या उत्खनन करत असताना एक पोकलेन मशिन व एका ट्रकवर कारवाई करून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती हवेलीचे महसूल नायब तहसीलदार समीर यादव यांनी दिली. (वार्ताहर)
वाळूमाफियांवर धडक कारवाई
By admin | Updated: June 30, 2015 23:17 IST