स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, बालक संस्थेच्यावतीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून साहित्य, संस्कृती व शिक्षण या क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्य करणा-या व्यक्तींना बालक मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे ज. गं. फगरे, संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष जोशी, उपकार्याध्यक्षा हेमलता वडापूरकर, माधवी जोशी, संस्थेचे संस्थापक सदस्य सल्लागार मा. बा. पारसनीस, धनंजय ओक, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे, अक्षरभारतीचे माधव राजगुरू, संवादचे सुनील महाजन व बालक संस्थेच्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. दिलीप गरुड व मुकुंद तेलीचरी यांना बालक मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल, श्रीफळ व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. दिलीप गरुड म्हणाले, ‘पुरस्कारामुळे चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते आणि जे काम करीत आहोत ते योग्य असल्याची जाणीव देखील होते. शिक्षक म्हणून मुलांना घडविताना त्यांच्याबरोबर प्रत्येकवेळी आपणही घडत असतो. शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक जसे आपल्याला घडवितात तसेच आपले अनुभवदेखील आपल्याला घडवित असतात.’
मुकुंद तेलीचरी म्हणाले, ‘मुलांवर चांगले संस्कार करण्यापेक्षा आजूबाजूच्या वातावरणातील वाईट संस्कार त्यांच्यावर होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते. मी शिक्षकीपेशातून निवृत्त झालो तरी जोपर्यंत मुलांमध्ये राहून कथाकथन करेल तोपर्यंत मी तरुण असेन.
ज. गं. फगरे यांनी मनोगत व्यक्त केले. हेमलता वडापूरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले, शिरीष जोशी यांनी आभार मानले.