पुणे : ३१ जानेवारी अखेरपर्यंत बँक लिंकिंग करा अन्यथा गॅसचा पुरवठा बंद करू, असा इशारा दिल्यानंतर चारच दिवसांत तब्बल दोन लाख २१ हजार गॅसग्राहकांनी आपले बँक लिंकिंग करून घेतले आहे. अजूनही १० लाख ग्राहकांचे बँक लिंकिंग नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.जिल्ह्यात डीबीटीएल योजना लागू झाल्याने ग्राहकांना प्रथम बाजारभावाप्रमाणे गॅस खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतर शासनाकडून गॅससाठी देण्यात येणारे अनुदान संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सर्व गॅसग्राहकांनी आपले बँक खाते क्रमांक आणि एलपीजी क्रमांकाची जोडणी(लिंकिंग) करणे बंधनकारक आहे. ३१ जानेवारी अखेरपर्यंत सर्व गॅसग्राहकांनी आपले बँक लिंकिंग करू घ्या अन्यथा आगामी काळात गॅस सिलिंडरचा पुरवठाच बंद करण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे. दरम्यान, सध्या गॅस अनुदानासाठी आधार लिंकिंग बंधनकारक नसले तरी भविष्यात सर्व ग्राहकांना आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या मशिनच्या माध्यमातून प्राधान्याने गॅसग्राहकांना आधार कार्ड देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे राव यांनी सांगितले. यासाठी गॅस एजन्सीने मागणी केल्यानंतर त्यांच्या ग्राहकांसाठी त्याचा एजन्सीमध्ये आधार कार्ड देण्याचा कॅम्प लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बँक लिंकिंग नसल्यास पुरवठा बंद
By admin | Updated: January 21, 2015 00:35 IST