पाटस : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस वेळेवर येत नसल्याने आज विद्यार्र्थ्यांनी संतप्त होऊन एसटी बस अडविल्या. दोन तास पाटस येथील सर्व्हिस रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. पाटस, वासुंदे, रोटी, हिंगणीगाडा, बिरोबावाडी या भागातील जवळपास हजारांच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी वरवंडला जात असतात. या सर्व विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाला रितसर पास काढलेला आहे. परंतु गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे त्यातच अभ्यासक्रम बुडू नये म्हणून विद्यार्थी खाजगी वाहनाने वरवंडला येतात. एसटीचा पास असताना देखील विद्यार्थ्यांना खाजगी गाड्यांचा अतिरिक्त आर्थिक फटका सोसावा लागतो. वरवंडवरुन येताना आणि वरवंडला जाताना वेळेवर गाड्या सोडाव्यात म्हणून वेळोवेळी एसटी महामंडळाला सूचना देखील करण्यात आल्या. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज आंदोलन करण्यात आले. यापुढे सर्वच गाड्या वेळेवर सोडल्या जातील. वरवंड आणि पाटस येथे दोन कर्मचारी नेमले जातील की जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या एसटी बस संदर्भात हे दोन्ही कर्मचारी दक्षता घेतील. सर्व एसटी चालक पुणे सोलापूर महामार्गावरील उड्डाण पूलावरुन न जाता ते सर्व्हिस रोडने वाहतूक करतील, असे आश्वासन एसटी महामंडळाच्यावतीने दिल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य मंगेश दोशी, तानाजी केकाण, माणिकराव भागवत, शिवाजी ढमाले, संजय शिंदे, जमीर तांबोळी, दीपक भंडलकर, राजू पानसरे, लहू खाडे यांच्यासह गावातील काही ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)
पाटसला संतप्त विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By admin | Updated: October 13, 2015 00:38 IST