पिंपरी : एरवी रस्त्याने पायी जाणाऱ्याच्या हातातील पिशवी पळविणारे, दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे चोरटे सद्य:स्थितीत शांत झाले आहेत. चोरीच्या घटनांसह हाणामारी, फसवणूक अशा गुन्हेगारी घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. रोज किमान दोन ते तीन गुन्हेगारी घटनांची शहरात नोंद होत असताना, या घटनांचे प्रमाण अचानक घटले. चलनाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेली परिस्थिती हेच त्यामागील कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. एरवी बिनधास्तपणे हजार, पाचशेच्या नोटांची थैली घेऊन जाण्याचे धाडस कोणी दाखवत नव्हते. कधी चोर येईल, हल्ला करून हातातील थैली पळवून नेईल, हे सांगता येत नव्हते. रस्त्यालगत उभ्या मोटारीच्या काचा फोडून कधी रोकड पळवली जात होती, तर कधी मोटारीतील लॅपटॉप पळवून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पळविण्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या होत्या. ८ नोव्हेंबरच्या रात्री चलनातील हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. या नोटा बॅँकेत जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. तसेच जुन्या नोटा जमा करून बदल्यात नव्या नोटा दिल्या जाऊ लागल्या. मात्र, नोटा बदलणाऱ्यांना केवळ चार हजार रुपयांचे बंधन घातले गेले. एटीएम बंद झाली. चलनातील नोटा मिळविण्यासाठी बँकांपुढे रांगा लागल्या. घरात असलेली हजार, पाचशेच्या नोटांच्या स्वरूपातील रक्कम भरण्यासाठी प्रत्येकजण बँकेकडे धाव घेऊ लागला. खर्चासाठी सुटे पैसे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. सर्व आर्थिक व्यवहारावर परिणाम जाणवू लागला. त्याचा परिणाम गुन्हेगारांवरही जाणवला आहे. (प्रतिनिधी)
नोटा बंदीने गुन्हेगारीला आळा
By admin | Updated: November 16, 2016 02:40 IST