पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणांर्तगत येणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघातील गावांतील अंतर्गत सुविधांचे नियोजन आणि विकासकामांना निधी द्यावा, या मागणीचे निवेदन महानगर प्रदेश क्षेत्रविकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांना ग्रामस्थांनी दिले.
त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी दिवसे व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भोर विधानसभा मतदार संघातील विषयावर चर्चा केली. यावेळी अमोल नलावडे, राहुल शेडगे, निकिता सणस, विशाल भिलारे, सचिन आंग्रे, अर्चना सुर्वे, सचिन हगवणे, रोहिदास आमले उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता लवकरात लवकर देण्यात यावा, मतदारसंघातील पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत समाविष्ट गावांना रस्ते विकास योजनांना दोन टप्प्यात मंजुरी देण्यात यावी याबाबत चर्चा झाली. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येत असलेल्या भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण हद्दीतील गावांचा नव्याने विकास आराखडा तयार करताना सरकारी गायरान जमिनींचे क्रीडांगण, अग्निशमन बंब, सांकृतिक भवन, बगीचे आदीसाठी आरक्षित निश्चित करणेबाबत सविस्तर चर्चा केली व याबाबत प्राधिकरण व जिल्हाधिकारी, पुणे यांची एक संयुक्त बैठक आयोजित करणेबाबत सूचना केल्या.
भोर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार लगत व मुळशी तालुक्यातील मौजे भरे येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरु करणेबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण हद्दीतील खेड शिवापूर टोलनाका अन्यत्र हलविणेकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचित करण्यात यावे आदी विषयावर महानगर आयुक्त सुहास दिवसे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.