पाईट: महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलांना अनन्य साधारण महत्व असून काळाच्या ओघात अनेक बदल झाले असले, तरी गावगाडा व्यवस्थित चालण्यासाठी पोलीस पाटील हा घटक आजही महत्वाचा आहे. दुर्लक्षित असलेल्या या घटकाला न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल, असे मत आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यस्तरीय पोलीस पाटलांच्या मेळाव्यात व्यक्त केले .
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने राज्य पदाधिकारी मेळाव्याचे व जिल्हा पोलीस पाटील पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याचे साई कृपा लॉन्स येथे आयोजन केले होते. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील बोलत होते. या वेळी संस्थेचे संस्थापक भिकाजी पाटील, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कार्यध्यक्ष भृंगराज परशुरामकर, माजी सभापती रमेश राळे पाटील , जिल्हा नियोजन सदस्य कैलास सांडभोर ,अरूण चांभारे , संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंके , अनिताताई वाजे , नयन पाटील , तृप्ती ताई मांडेकर , दादा पाटील काळभोर व राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पोलीस पाटिल उपस्थित होते
संघाच्या अध्यक्षपदी साहेबराव राळे यांची निवड झाल्याबदल त्यांचा आमदार दिलीप मोहिते व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी मोहिते म्हणाले, काळाच्या ओघात बदल झाले. आनेक वतनदाऱ्या गेल्या पण पोलीस पाटीलकी कायम आहे.देशाचे नेते शरद पवार यांच्या धोरणामुळे पोलीस पाटील पदासाठी ५१ टक्के माहिलांची भरती झाली आहे. संघटनेत महिलांवर्गाकडे दुर्लक्ष करू नका. या वेळी राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस पाटील हा घटक दुर्लक्षित असून त्यांच्या अनेक मागण्या सरकारदरबारी कार्यक्षमपणे मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी गाव कामगार पोलीस पाटील संघाची स्थापना झाली आहे.पोलीस पाटलांच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री बंटी पाटील यांनी दिले आहे. तसेच सर्व पोलीस पाटलांचे नूतनीकरण बंद करण्याचा निर्णय झाला आहे. सध्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे आणी १० हजार रुपये मानधन या मागण्या सरकारकडे प्रलंबित असून मागण्या लवकरच मान्य करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ नवले पाटील यांनी केले, तर आभार नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे यांनी केले.