लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने कुुठलीही मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) जाहीर केली नाही. पुणे महापालिकेला त्यामुळे लस खेरदीसाठी जागतिक निविदा काढता येत नाही, असे सांगून महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राज्य शासनाने लस खरेदीसाठी आमच्या परवानगीची गरज नसल्याचे तरी महापालिकेला लेखी कळवावे, अशी मागणी केली आहे़
राज्य सरकारने लस खरेदीसाठी मुंबई महापालिकेला जागतिक निविदा काढण्याबाबत परवागनी दिली आहे. मात्र, पुणे महापालिकेने लस खरेदी करण्याची मागणी करणारे पत्र २० एप्रिललाच राज्य सरकारला पाठविले असले तरी अद्याप त्याला उत्तर दिलेले नाही. आमचा मुंबईला विरोध नाही; पण राज्य सरकारने हा दुजाभाव करू नये, अशी आमची मागणी आहे़
राज्य सरकार हे राज्यातील महापालिकांचे पालक आहे. राज्य सरकारला विचारल्याशिवाय आम्हाला पुढील कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे पुण्यासह नाशिक, नागपूर आदी महापालिकांना लस खरेदीबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता असल्याने सरकारने त्या तत्काळ जाहीर कराव्यात, असे बिडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
--
प्रशासन, पदाधिकारी यांच्यातच एकवाक्यता नाही
कोरोना प्रतिबंधात्मक लस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा काढण्याबाबत महापालिकेतील पदाधिकारी यांच्यातच एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने राज्य शासनाच्या परवानगीची गरज नसल्याचे सांगून, जागतिक निविदा काढण्यासाठी मुंबई महापालिकेकडून निविदांचा नमुनाही मागवून घेऊन सदर प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, लस खरेदीसाठी राज्य शासनाच्या परवानगीची गरज नसल्याचे दोन दिवसांपूर्वीच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले असताना, बिडकर हे राज्य सरकार परवानगी देत नसल्याचे सांगून, लस खरेदीसाठी निविदा काढण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची मागणी करीत आहे. यामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्येच तथा पदाधिकारी व प्रशासन यांच्यामध्येही एकवाक्यतेचा अभाव दिसून येत आहे.