पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी सोमवारपासून आॅनलाईन शाळा नोंदणीला सुरुवात झाली आहे. यंदा प्रवेशप्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यात आली असून पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी केवळ आॅनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाहीत, मुख्याध्यापकांकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित केला जाईल, असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले.राज्याच्या शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशप्रक्रियेचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळांमध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आॅनलाईन आरटीई प्रवेशाचा बोजवारा उडाला. आॅनलाईन अर्जाबरोबच मूळ कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य होते. त्यामुळे पालकांना सायबर कॅफेतून पैसे मोजून अर्ज भरावा लागत होता. त्यात वेळ आणि पैसा वाया जात होता. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी पात्र असूनही काही पालक आपल्या पाल्याचा अर्ज भरत नसल्याचे दिसून येत होते. मुश्ताक शेख म्हणाले, ‘‘गेल्या वर्र्षी ७८० शाळांमधील जागांसाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवली जात होती. यंदा शाळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरटीईची प्रवेशक्षमताही वाढली आहे. शाळांच्या प्रतिनिधींना आॅनलाईन शाळा नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून शाळा नोंदणीच्या कामास सोमवारपासून सुरुवात झाली. सर्व पात्र शाळांना येत्या ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी कराता येईल. यापूर्वी अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागत होती. त्यामुळे पालकांची अडचण होत होती. यंदा केवळ अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जासोबत कोणतेही कागदपत्र अपलोड करावे लागणार नाहीत. आॅनलाईन अर्जाच्या माहितीवरून प्रवेश निश्चित केला जाईल. विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे मुख्याध्यापकांकडून तपासली जातील. (प्रतिनिधी)
आरटीईसाठी शाळा नोंदणी सुरू
By admin | Updated: January 24, 2017 02:40 IST