आळंदी : खेड तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू झाली असून, आळंदी महसुली व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींचीही निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. प्रथमच आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक जण संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, तिथे पक्षाऐवजी पॅनलप्रमुख कोण, याचे विशेष महत्त्व विचारात घेतले जात असून, बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या या परिसरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सोमवार, दि. १३ जुलैपासून उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आळंदी महसुली व पोलीस ठाणे हद्दीतील चिंबळी, केळगाव, मरकळ, गोळेगाव, पिंपळगाव, कोयाळी, धानोरी, चऱ्होली खुर्द, कुरुळी व मोई या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आळंदी परिसरातील या गावांमध्ये पक्ष कोणता, याला विशेष महत्त्व दिले जात असून, प्रत्येक इच्छुक गटाकडून योग्य, सक्षम व कार्यक्षम पॅनलप्रमुख पुढे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावच्या विकासासाठी झटणाऱ्या व पूर्वी केलेल्या कामाचा प्रभाव मतदारांवर पाडू शकेल, अशी व्यक्ती पॅनलप्रमुख म्हणून समोर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावात कुठे दोन, तर कुठे तीन पॅनलपैकी योग्य प्रतिनिधी ठरविण्यासाठी मतदारांनाही जागरूकतेने मतदान करावे लागणार आहे. परिसरातील बहुतांश गावंत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्राबल्य असले, तरी गावाच्या विकासासाठी तरुणांची योग्य व पक्षविरहित फळी तयार करून पॅनल तयार होत आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांचे गाव म्हणून परिचित असलेल्या धानोरी ग्रामपंचायतीचीही निवडणूक होत आहेत. एकूण १,२५० मतदारसंख्या, ३ प्रभाग व ९ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जागा इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. गावात शिवसेना व राष्ट्रवादीचे प्राबल्य असले, तरी पॅनलप्रमुख कोण, हेच अद्याप स्पष्ट नसले तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करणारे व जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिचित असलेले राम गावडे यांना स्वत:च्या गावात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.
आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
By admin | Updated: July 13, 2015 23:45 IST