पुणे : शहरातील संचेती चौकातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ते पाटील इस्टेट उड्डाणपुलाच्या कामांची फेरनिविदा काढण्याचा स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडण्यात आलेला आहे. फेरनिविदेमुळे पुलाचे काम आणखी दोन वर्षे रखडणार आहे, असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने संचेती हॉस्पिटलजवळ दोन मजली उड्डाणपूल उभारण्याचे काम २०१२ पासून सुरू आहे. या कामासाठी प्रकल्पीय तरतूद ही ५० कोटी रुपये धरण्यात आली होती. या कामासाठी मागविण्यात आलेली निविदा ३६ टक्के दराने जास्त आली. स्थायी समितीने कोणताही आक्षेप न घेता हे काम करण्यास मान्यता दिली होती. मात्र, अभियांत्रिकी महाविद्यालयाने या पुलाला आक्षेप घेतला. त्यामुळे या पुलाचा आराखडा बदलण्यात आला. त्यामुळे २१ कोटी ८३ लाखांनी पुलाचे काम वाढले आहे. अखेर टी अँड टी प्रा. लि. या कंपनीने १४ टक्के जास्त दराने निविदा भरली. या कंपनीला हे काम देण्यास विरोध करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्याचा फेरविचार प्रस्ताव नगरसेविका आशा साने यांनी दिला आहे.वस्तुत: या कंपनीने या तीनही पुलांची कामे केलेली नाही. आताच्या निविदेनुसार काम चालू केले असता ते पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्याचबरोबर या कामाचे फेरटेंडर काढण्यास ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लागू शकेल. त्यामध्ये आता पुन्हा आणखी दोन वर्षे या पुलाचे काम रखडल्यास त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या फेरनिविदेचा स्थायीने फेरविचार करावा, असा प्रस्ताव साने यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
संचेती उड्डाणपुलाबाबत स्थायीसमोर फेरप्रस्ताव
By admin | Updated: September 19, 2015 04:45 IST