पुणे : गेली १० दिवस दररोज हजेरी लावत असलेल्या वरुणराजाने दिलेली उघडीप, त्यामुळे ओसंडून वाहणारा उत्साह, आसमंत दणाणून सोडणारे ढोलवादन, डीजेचा दणदणाट, लहानग्यांची मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके व शाही थाटात सामाजिक भान, रांगोळ्यांच्या पायघड्या, रांगोळ्यातून माळीण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अशा जल्लोषात २९ तास १२ मिनिटे चाललेल्या विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली़ गतवर्षी २७ तास २५ मिनिटे मिरवणूक चालली होती़ फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेला बॉम्बस्फोट, अल कायदाने दिलेली धमकी तसेच गुप्तचरांनी दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान पुणे पोलिसांवर होते़ अतिशय चोख बंदोबस्त ठेवून विसर्जन मिरवणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पोलिसांनी आपल्यावरील बंदोबस्ताची जबाबदारी पेलली़ मिरवणुकीतील मानाचे पहिले पाच गणपती आणि शेवटचे भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या विसर्जनाला गतवर्षीच्या तुलनेत यंदा उशीर झाला़ लक्ष्मी रोडवरील मिरवणुकीपेक्षा टिळक रोडवरील मिरवणुक गेल्या दोन-तीन वर्षांपासून रेंगाळू लागली आहे़ लक्ष्मी रोडवरील मिरवणुकीत २२९ मंडळे सहभागी झाली होती़ गतवर्षीपेक्षा त्यात जवळपास ९७ मंडळांची यंदा वाढ झाली़ टिळक रोडवरील मिरवणुकीत यंदा १६१ मंडळे सहभागी झाली होती़ टिळक रोडवरील गणेश पेठेतील त्रिमूर्ती तरुण मंडळाच्या श्रींचे सिद्धेश्वर घाटावर दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी विसर्जन होऊन मिरवणुकीची सांगता झाली़ गणेशोत्सव सुरूझाल्यापासून पहिले दहा दिवस पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली होती़ त्यामुळे मंडळांची आरास पाहण्यास भाविकांची गर्दी कमी होती़ शेवटचे दोन दिवस आणि विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने काल नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती़ पालकमंत्री अजित पवार, पोलीस आयुक्त सतीश माथूर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महापौर चंचला कोदे्र यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीला पुष्पहार घालून आरती केली़ त्यानंतर बरोबर १० वाजून ३० मिनिटांनी मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली़ मानाचे पहिल्या पाच गणपतींचे सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी विसर्जन झाले़ लक्ष्मी रोडवरील मिरवणुकीत ढोलताशा पथकांचे वर्चस्व होते़ पोलिसांनी २ पथकांचे बंधन घातले असले तरी कोणत्याही मंडळाने ते पाळले नाही़ एका पथकात ३० ते ६० ढोल-ताशांचा समावेश होता़ रात्री ९ वाजता जिलब्या मारुती मंडळाचा गणपती बेलबाग चौकात आला़ त्यानंतर पहाटेपर्यंत संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर बाबू गेनू, भाऊ रंगारी, अखिल मंडई आणि दगडूशेठ हलवाई या प्रमुख मंडळांची पथके होती़ लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत पहिले पाच मानाचे गणपती आणि नंतरचे भाविकांचे आकर्षण असलेल्या पाच मंडळांना सर्वाधिक वेळ लागत आहे़ लक्ष्मी रस्त्यावरील शेवटचा महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती आज सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभागी झाला़ त्याचे विसर्जन सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी झाले़ टिळक रोडवरील मिरवणुकीत यंदा १६१ मंडळे सहभागी झाले होते़ फुलांची आकर्षक आरास, बालाजी सुवर्ण मंदिर, मयूर रथ, तसेच आकर्षक देखावे टिळक रोडवरील मंडळांकडून सादर करण्यात आले होते़ ते पाहण्यासाठी रात्री लक्ष्मी रोडएवढीच टिळक रोडवरही गर्दी झाली होती़ कुमठेकर रोडवरील मिरवणुकीत ३४ मंडळे सहभागी झाले होते, तर केळकर रोडवरील मिरवणुकीत १२३ मंडळांचा सहभाग होता़ या दोन्ही रस्त्यांवरील मिरवणुक रात्री सातनंतर सुरूझाली़ डीजेच्या दणदणाटाने परिसर हादरून जात होता़ मध्यरात्री बारानंतर पोलिसांनी डीजे बंद करायला लावले़ त्यामुळे अनेक मंडळे मिरवणूक मार्गावर अर्ध्या वाटेत थांबून राहिले़ सकाळी ६ वाजता डीजेचा दणदणाट पुन्हा सुरूझाला़ पण पोलिसांनी वेगाने मिरवणूक पुढे ढकलण्यास सुरुवात केली़ मध्यरात्री १२ नंतर डीजे बंद करायला लावण्यात आले तरी ढोलताशा पथके सुरू होती़ त्यांचा आवाजही तितकाच मोठा होता, असे ध्वनिप्रदूषण तेवढेच असल्याचे दिसून आले़ जनजागृतीमुळे गुलालाचा वापर दरवर्षी कमी होत असल्याचे दिसून आले़ (प्रतिनिधी)
वैभवशाली मिरवणूक रंगली २९ तास
By admin | Updated: September 10, 2014 06:16 IST