पवनानगर : पाऊस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तालुक्यात शेतकर्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. तर उसाच्या पिकाला खताची मात्रा देऊन ऊसबांधणीची कामे देखील वेगाने सुरू आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर उसाला खाद्य देणे व ऊस बांधणे हे शक्य नसल्याने जादा मजूर लावून उसाला शेणखत, कोंबडीखत व रासायनिक खते दिली जात आहेत, तर खते देऊन उसाची बैलाच्या नांगराने नांगरून पुन्हा सरी बांधली जात आहे. या कामासाठी शेतकरी एक औत जोडीला ५०० ते ७०० रुपये हजेरी देऊन काम करून घेत आहेत. तर दुसरीकडे जे शेतकरी भाताचे पीक घेणार आहेत. त्या शेतकर्यांनी भाताची रोपे पेरणीसाठी मशागतीची कामे सुरू केली आहेत. मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने लगबग सुरू आहे. दोन दिवसांत भाताच्या पेरणीला वेग येणार असून, इंद्रायणी, कोळम, आंबेमोहर, समृद्धी, सह्याद्री या वाणाची बेणे खरेदी करत आहे. इंद्रायणीच्या बियाणास मोठी मागणी असून, हे बी कमी प्रमाणात उपलब्ध असल्यानशेतकरी बियाणे अॅडव्हान्स देऊन बुकिंग करत आहेत. (वार्ताहर)
पवन मावळमध्ये मशागतीस वेग
By admin | Updated: May 31, 2014 07:12 IST