पुणे : बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्यापूर्वी विधी विभागाचा लेखी अभिप्राय घेण्याची किचकट अट घातल्यानंतर महापालिका प्रशासनाने बनावट डॉक्टरांवर कारवाई करणे अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर आता बनावट डॉक्टर शोधण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, विशेष पथकांकडून शोधलेल्या या डॉक्टरांवर कारवाई होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरातील झोपडपट्ट्या, उपनगर परिसरात परराज्यातील तसेच स्थानिक बनावट डॉक्टर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. बनावट पदव्यांचे प्रमाणपत्र लटकावून ते बिनबोभाट काम करीत आहेत. याविरोधात असंख्य तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. या डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असेत. या पार्श्वभूमीवर बनावट डॉक्टर शोधण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. येत्या आठवड्यापासून खास पथकांमार्फत त्यांचा शोध घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)
बनावट डॉक्टरांविरुद्ध आता विशेष पथके
By admin | Updated: February 2, 2015 02:29 IST