पुणे : आर्थिक घोटाळ्यांमुळे डबघाईला गेलेल्या रुपी को-आॅपरेटिव्ह बँकेच्या थकीत कर्जदारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी सहकार विभागाकडून पूर्णवेळ विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच ही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.कर्जदारांनी कर्जे बुडविल्यामुळे संचालक आणि बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे बँके ची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर प्रशासकीय मंडळ नेमले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या बँकेचा कारभार प्रशासकीय मंडळामार्फत चालवण्यात येत आहे. त्यांच्या कारभारावर सहकार विभागाकडून देखरेख ठेवण्यात येते. बँकेने गेल्या काही वर्षांत दिलेली कर्जे थकली आहेत. कर्जदार पैसे परत करीत नसल्याने बँकेची स्थिती सुधारत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी सहकार विभागाने पूर्णवेळ विशेष वसुली अधिकारी द्यावा, अशी मागणी प्रशासकीय मंडळाकडून करण्यात आली होती. त्यासाठीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे मंडळाने दाखलही केला होता. तो प्रस्ताव आयुक्तांनी मंजूर केला आहे.याबाबत सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘‘बँकेच्या कर्जवसुलीसाठी सहकार विभागाचा पूर्णवेळ अधिकारी द्यावा, अशी मागणी प्रशासकीय मंडळाने केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारचीही परवानगी हवी असल्यामुळे तो प्रस्ताव त्यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.’’
कर्जवसुलीसाठी आता विशेष अधिकारी
By admin | Updated: May 28, 2016 04:26 IST