ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या मतदारसंघातील दोन गणातील महिलांचे अर्ज छाननीत बाद ठरविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. मात्र, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असून या दोन्ही महिलांचे अर्ज मंजूर करुन त्यांना उमेदवारी देण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाºयांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कावेरी कुंजीर ( थेऊर गण) आणि संजिवनी कापरे (पेरणे गण) या दोन्ही महिलांच्या अर्जावर तीनपैकी एका ठिकाणी सही राहिल्याने निवडणुक निर्णय अधिकाºयांनी छाननीत बाद ठरविले होते. निवडणूक निर्णय अधिका-यांच्या या निर्णयाविरुद्ध त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप वडणे यांच्यासमोर शुक्रवारी या अर्जावर सुनावणी झाली़ उमेदवारांच्या वतीने अॅड़ प्रताप परदेशी आणि अॅड़ सी़ के़ भोसले यांनी सांगितले की, निवडणूक निर्णय अधिकाºयांनी नोटीस दिली तरी त्यात तुमचा अर्ज अपूरा आहे, असे म्हटले नव्हते़ तसेच त्यांचा आॅनलाईन अर्ज योग्य आहे़ अर्जात तीनपैकी केवळ एका ठिकाणी सही नव्हती़ निवडणुक निर्णय अधिकाºयांनी अर्जाची छाननी करताना कोणती काळजी घ्यायची याच्या मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात दिल्या आहेत, त्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले़ न्यायालयाने त्यांचे म्हणणे ग्राह्य धरुन कावेरी कुंजीर आणि संजिवनी कापरे या दोन्ही महिलांचे अर्ज मंजूर करुन त्यांना उमेदवारी देण्याचा आदेश दिला आहे.
हे दोन्ही अर्ज बाद झाल्याने या दोन्ही गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह गोठवले गेले होते़ परंतु, न्यायालयाच्या निर्णयामुळे आता तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आले आहेत.