पुणे : मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांवर चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. सुनेने सासुला लाकडी दांडक्याने मारहाण केली.
याप्रकरणी पुरणचंद आहेर (वय ६८, रा. गवळीवाडा, खडकी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांचा मुलगा कपिल (वय ३६) आणि सून निशा आहेर (वय ३०) यांच्याविरद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आहेर कुटंबीय खडकीतील गवळीवाडा परिसरात रहायला आहेत. जुनी तालीम परिसरात त्यांचे घर असून शेजारी कडबा कापणी यंत्र ठेवण्यात आले आहे. पुरणचंद यांना तेथे गोठा करायचा आहे. त्यासाठी त्यांनी कापणी यंत्र काढून टाकण्यासाठीर खडकी कँट्रोंमेंट कार्यालयात अर्ज दिला आहे. या कारणावरुन कपिल वडिलांवर चिडून होता. पुरणचंद हे २७ नोव्हेंबरला रात्री पावणेदहा वाजता गाडी पार्क करीत असताना कपिल यांनी आईच्या नावावर असलेली कडबा कुट्टी कापणी मशीन काढण्याबाबत अर्ज का दिला अशी विचारणा करुन वाद घातला. त्याने वडिलांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यात झटापट होऊन पुरणचंद यांच्या हाताला व बोटाला दुखापत झाली. कपिल याची पत्नी निशा हिने भांडणात मध्यस्थी करणार्या सासुला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात सासुचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक संभाजी तांबे अधिक तपास करीत आहेत.