बारामती : माळेगाव, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. त्या पाठोपाठ श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील होणार आहे. माळेगावच्या निवडणुकीत चंद्रराव तावरे-रंजन तावरे हे गुरू शिष्य ‘सहकार बचाव पॅनेल’च्या १९९७ नंतर पुन्हा एकत्र आले आहेत. परंतु, शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सोमेश्वर, माळेगावच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेलने निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तिरंगी लढतीमुळे रंगत येणार आहे.सोमेश्वरला काकडे गट एकत्र आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतील नाराज मंडळी देखील शेतकरी कृती समितीत दाखल झाले आहेत. या कारखान्याचे कार्यक्षेत्र खंडाळा, बारामती, पुरंदर असे आहे. त्यामुळे त्या भागातील प्रभावी नेत्यांनी देखील काकडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कृती समितीला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे या कारखान्याची निवडणूक स्वतंत्र लढविणार आहेत. माळेगावला १९९७ साली चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्या अधिकृत पॅनल विरोधात निवडणूक लढवून कारखान्यावर सत्ता मिळविली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी मध्यस्थी करून चंद्रराव तावरे - अजित पवार यांच्यातील वाद मिटविला. कारखान्याची निवडणूक तडजोडीने झाली. ही तडजोड काही कार्यकर्त्यांना महाग ठरली. चंद्रराव तावरे सत्तेत गेल्यानंतर रंजन तावरे यांनी विरोधकाची भूमिका बजावली. तत्कालिन ज्येष्ठ नेते एस. एस. हिरेमठ यांनी ऊस दराच्या संदर्भात केलेल्या आंदोलनाला रंजन तावरे यांनी पाठिंबा दिला. पुढच्या निवडणुकीत तावरे यांच्यासह ७ संचालक विरोधी म्हणून निवडून आले. सहकाराचे प्राधिकरण आदी कारणांमुळे निवडणुका रखडल्या. जवळपास ८ वर्षानंतर कारखान्यांच्या निवडणूका होत आहेत. माळेगावचे ११ ते साडेअकरा हजार मतदार आहेत. कार्यक्षेत्र मर्यादित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनेलने जातीय समीकरणे राखत उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांच्या थोरल्या भावालाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने ढवाण कुटुंबियातच राजकीय काहुर माजले आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक जयसिंग ऊर्फ बबलू देशमुख यांनी विरोधी भूमिका घेऊन निवडणूक लढविली. बारामती शहराच्या राजकारणात त्यांचे वडील माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोककाका देशमुख यांचा दबदबा आहे. बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला. असे असताना देशमुख यांच्याबरोबर काम करणारे माजी पंचायत समिती सदस्य शहाजी गावडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)
‘सोमेश्वर’,‘माळेगाव’चा सत्तासंघर्ष तीव्र
By admin | Updated: March 13, 2015 06:24 IST