वडगाव मावळ : विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सेल्फी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याला मावळातील काही शाळेतील शिक्षकांनी सेल्फी काढून समर्थन केलेल तर काही शिक्षकांनी विरोध केला. मात्र, लोकमतच्या वृत्तानंतर शिक्षक संघटनांनी सेल्फीस विरोध सुरु केला आहे. सेल्फी सक्तीसंदर्भात शिक्षक संघटनांच्या कोलांटउडीमुळे मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शालेय पोषण आहार व इतर शैक्षणिक माहिती आॅनलाईन भरुन समस्त शिक्षक वर्ग वैतागलेला असताना त्या विषयी कोणीच आवाज उठवला नाही. सेल्फीचा निर्णय आला. त्याचे प्रशिक्षणही शांततेत झाले. त्या प्रशिक्षण कार्यक्रमावेळीही शिक्षक संघटना शांत होत्या. ऐन सेल्फी घ्यायच्या दिवशी म्हणजे ९ जानेवारीला ‘लोकमत’ने सेल्फी व आनलाइन कामांविषयी शिक्षकांची बाजू मांडल्यावर शिक्षक संघटना खडबडून जाग्या होत सेल्फीवर बहिष्कार अशा घोषणा करू लागल्या. संघटनांनी अचानक केलेल्या या घोषणेमुळे सामान्य शिक्षकवर्गात मात्र गोंधळ उडाला. या गोंधळात काहींनी सरकारी आदेशाचे पालन करत सेल्फी काढला तर काहींनी संघटनांच्या सुरात सुर मिसळत सेल्फीला नकार दिला. पण, जर बहिष्कार टाकायचाच होता तर प्रशिक्षण का घेतले? प्रशिक्षणावर सरकारचे लाखो रुपये का खर्च केले? आधीपासूनच्या सर्वच आॅनलाईन कामांवर सर्व संघटनांनी का बहिष्कार टाकला नाही? फक्त सेल्फीवरच संघटना अचानक एवढ्या का आक्रमक झाल्या, असे प्रश्न शिक्षकांकडून विचारले जात आहेत. सध्या शिक्षकांना प्रत्येक काम दोन वेळा करावे लागत आहेत. एकदा आॅनलाइन व दुसऱ्यांदा लेखी. यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, असे पालक व शिक्षकांमधून विचारले जात आहे. एकीकडे शिक्षकांनी अध्यापन करताना मोबाइल वापरु नये म्हणायचे व दुसरीकडे सेल्फी काढून सर्व शैक्षणिक कामे मोबाइलवरच करायला लावायची, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका सर्वसामान्यांमधून होत आहे. (वार्ताहर)विकासनगर : अॅपद्वारे उपस्थिती नोंद सुरु किवळे : विकासनगर येथील प्राथमिक शाळेत सोमवारपासून शालेय वेळेत शिक्षकांनी विद्यार्थी उपस्थिती/सेल्फी हे अँड्रॉइड मोबाइल अँप्लिकेशनचा उपयोग करून हजेरी नोंद सुरु केली आहे. विकासनगर येथील महापालिका शाळेत अँपद्वारे सोमवारी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्याची उपस्थिती आणि सेल्फीसह उपस्थिती अशा दोन्ही प्रकारे हजेरी नोंद करण्यास सुरूवात केली असून सदर अॅप डाऊनलोड केले असल्याचे मुख्याध्यापिका सरस्वती भेगडे यांनी सांगितले आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या विविध शाळांमध्येही विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सेल्फी काढण्यास प्रारंभ केला आहे.
सेल्फीसक्ती रद्दमुळे समाधान
By admin | Updated: January 12, 2017 02:48 IST